Wednesday, 3 January 2018

कर्नाटक सुपरफास्ट एक्सप्रेस ...एक प्रवास




               

कर्नाटक सुपरफास्ट एक्सप्रेस मनमाड स्टेशनला आली,अन मनाची घालमेल ही वाढली, गाडीमध्ये बसावं की नाही,या विचारात तब्बल १० मिनिटे गेली; नवख्या खान्देशात जायचं होतं,धीर लागत नव्हता,माझ्या मनाची तर तयारीच नव्हती गाडीमध्ये  बसायच कारण माझ्या तत्वामध्ये बसत नव्हतं, तिकीट न काढता प्रवास करायचा तो! आम्ही तिकीट काढलं नव्हतं अस नाही, म्हणजे आम्ही ज्या रेल्वेचं तिकीट काढलं होत (सचखंड एक्सप्रेस)तिला अजून १ तास अवधी होता, पण अभिजतच म्हणणं होतं की आपण कर्नाटक एक्सप्रेसनच जायचं! माझा नाईलाज होता,मला ही थकवा जाणवत होता.
      जनरल डब्बा शोधता शोधता रेल्वेचं शेपुट आलं,तिथं पोहचतो न पोहचतो तोच ताणून उभा राहिलेली गाडी सैल व्हायला लागली, धावतच डब्ब्याच्या दरवाजाजवळ पोहचलो, पलीकडच्या दरवाजात एक १८-१९ च्या वयातील तरुणी TC सोबत भांडत होती, तिच्या सोबतचा तरुण मात्र गप उभा होता.मुलीचा आवाज घाबरलेला नव्हता, ती त्वेषाने TC ला बोलत होती जणू तीन काहीच केलं नाही.(तिकीट मात्र काढलं नव्हतं)मी तीच धैर्य पाहत होतो, अचानक माझ्या शर्टला पकडून अभिजितन मला डब्ब्यात कोंबल.

     माझा अजूनही एकच पाय खाली टेकलेला होता,दुसरा पाय अजून अधांतरी होता,खाली टेकण्यासाठी धडपडत होता, पायात बूट असल्याने उगीच माझे  पाय मला आज मोठे वाटत होते. किती गर्दी ती, म्हणजे मी एकटाच नव्हतो असा,त्या डब्ब्यातला प्रत्येक जण असाच उभा होता,त्यांच्या चेहऱ्यावरुन तस भासत होतं.तसा जनरल डब्बा माझ्यासाठी नवीन नव्हता,९-१० वर्ष याच डब्ब्याने प्रवास केला.पण आज श्वास घ्यायला ही जागा नव्हती.कसाबसा २०मिनिटांनी पाय खाली टेकला अन जीवात जीव आला. सर्व डब्बाच परप्रांतीय प्रवाशाने भरला होता अन आम्ही दोघचं त्यात मराठी, आपल्याच प्रांतात हरवलेल्या सारख आम्ही एकमेकाकडे पाहत होतो. त्यांच्या अंगाच्या घुर्रट वासाने दोघांचं ही डोकं दुखू लागलं,त्यांच्या तोंडातल्या माव्याने तर अख्खा डब्बा प्रदूषित झाला होता. खर तर अभिला अन मला उतरू वाटत होतं पण आता पर्याय नव्हता, गाडी आता जळगावलाच थांबणार होती. आमच्या कपड्याची तर त्यांनी पार वाट लावली होती. किळसपणा काय असतो आज कळाला.आश्चर्य तर तेव्हा वाटलं जेव्हा टॉयलेट चा दरवाजा कोणीतरी उघडला, त्यात ४ जण मस्त निवांत बसले होते😊.गाडी ८०-१०० km/hr ने धावत होती, पण आम्हाला वाटत होतं तीन आज अजून जोरात पळावं.
न राहून  मी समोरच्या समवयस्क तरुणाला विचारलं ,भाई तुम सारे एक साथ हो क्या? कहा,जा रहे हो? क्या करते हो? मगवापासून तुंबलेले प्रश्न एकामागून एक विचारले.समोरचा तो तरुण दरवाजातून बाहेर तोंड कडून मनसोक्त थुंकला, अन मोकळा झाल्यावर माझ्याकडे बघू लागला."हा भाई हम कर्नाटक से है और हम लखनौ जा रहे है।वहा फॅक्टरी मे काम करते है। काम के वास्ते हम हरसाल जाते है।अजून बरच काही बोलला.
'गरिबी' व 'पैसे'ची हतबलता होती त्या गर्दीचं कारण! त्यासाठी किती सौदे केले होते त्यांनी,त्यांच्या घरासोबत ,शिक्षणासोबत, आवडी-निवडीसोबत. अंगावर साचलेल्या मळाच्या थराने अन त्यांच्या त्या निस्तेज चेहऱ्याने त्यांची ढोर-मेहनत लपत नव्हती. १८-२० वयाच्या त्या केविलवाण्या चेहऱ्याकडे पाहून मी खुप श्रीमंत असल्यासारखं वाटायला लागलं.(मुळात तस नाही) मी सगळ्या डब्यात नजर फिरवली, मला आता किळस नव्हती येत, करूनतेचा पान्हा हृदयात फुटत होता.कोवळ्यापनीच कठोर झालेली त्यांची मनं वाचता येऊ लागली.
         रेल्वेच्या भोंग्याने तंद्री भंग पावली, कोणतं तरी स्टेशन आलं होतं, थोडा मोकळा श्वास घ्यावा म्हणून दरवाजातून बाहेर तोंड काढलं, एक थंडगार हवेची झुळूक गालाला चिकटून गेली, खूप बरं वाटलं, पण खिडकीतून कोणीतरी पचकन थुंकलं होतं, खूप ओशळयागत झालं.तोंड साफ करून बाहेर पाहत होतो, खानदेश सुरू झाला होता, छोटे मोठे डोंगर  सांजच्या भग्न  वाऱ्याने ताठरलेले वाटत होते. वातावरण ही थोडं रंगेल झालं होतं.
   ढोलकीच्या तालावर एक छोटी मुलगी हिंदीतल्या  चित्रपटातलं गाणं म्हणत पैसे मागत होती, गाणारी ६-७ वर्षाची छोटी मुलगी १७-१८ वयाच्या मुलीच्या ढोलकीच्या तालावर गात होती. गर्दीमुळे मी फक्त आवाज ऐकू शकत होतो.ते जोडपं गर्दीतून वाट काढत येत होतं. माझ्या बर्थजवळ जवळपास २०-२५ तरुण दाटीवाटीने ताटकळत बसले होते,काही उभे होते, त्या आवाजानं थोडं का होईना हायसं वाटलं.
गुलाबी फ्रॉक घातलेली छोटी मुलगी गाणं म्हणत होती, (आवाज तेवाढाही  बेसूर नव्हता!) सगळ्यांच्या नजरा मात्र त्या तरण्या मुलीकडे होत्या, गोरा वर्ण, नाकाची अचूक ठेवण, शेंदऱ्या गंधाने ती अधिकच खुलून दिसत होती.नेमकाच वयात आलेला तिचा ऊर तिला सौंदर्य प्रदान करत होता. ती मधेच बारकीच्या सुरात सूर मिसळून गायची. तिला पाहून वाटत नव्हतं ती गरीब असेल कारण ती सौंदर्याने खरोखरचं श्रीमंत होती.त्यामुळेच सगळे जण तिला पैसे देत होते अन तेही १०-१० रुपये!(मी नाही दिले,ज्याला हातपाय, डोळे आहेत त्यांना मी कधीच पैसे देत नाही).अगदी अभिजितने ही बारकीला ५ रुपये दिले. त्या गात होत्या अन ते तरुण त्यांना पैसे देत होते.
समोर जायला रस्ता नसल्याने ती जोड तिथेच त्या तरुणांमध्ये बसली, आश्चर्य त्यांना एवढ्या गर्दित ही जागा  मिळाली! त्या आता शांत झाल्या,थकल्या असाव्या! ५-१० मिनटं अशीच गेली ,सर्व शांत होतं, नेमकेच वयात आलेले तरुण तिला न्याहाळत होते,गुपचूप! मी त्या तरुणांना बघत होतो, मला वाटत होतं तिने आता जावं!पण ती तिथेच बसलेली होती. आता चुळबुळ वाढली होती, वर एकदोघ झोपलेले होते,त्यांनाही बाजु वाल्याने उठवलं. सगळ्यांची नजर आता शिकार्यासारखं सावजावर पडत होतीं, कारण सावज आता स्थिर झालं होत,पहुडलं होतं.
त्यातला एक शिकारी सावजाला फूस लावत होता,"२० रुपये देतो उभा राहून गाणं म्हण."त्या कारणाने त्याला सावजाला पूर्ण न्याहाळाचं होतं. ती थकली होती ,ती फक्त हसली,बहुतेक तिने ओळखलं असावं.पण त्या २० रुपयाच्या नोटेकडे पाहून बारकीच मन आशेनं पाझरलं, ती लगेच उभा राहिली, तिला तिनं ढोलकी वाजायला खुनवलं, ती फक्त  बारकिकडे पाहत राहिली, अन हसली.अन गप झाली, मला कळत नव्हतं, तिच्या मनात काय चालू आहे.तिचा नजरेने मात्र शिकाऱ्याला ओळखलं होतं. तरी ती शांत होती, मला अप्रूप वाटलं! हसल्यावरही ती गोड दिसायची, त्यामुळे दुसऱ्या  शिकाऱ्यालाही चेव यायला,मगवाची शांतता आता भंग पावली,वातावरणातला रंगेलपणा कधी डब्ब्यात आला काही कळलंच नाही. कोणी आता२० रुपये ,३०रुपये हवेत फिरवत होत, जस काय डब्ब्यात तमाशा रंगात आलाय..
तरीही ती शांत होती, हसत होती, सगळीकडे नजर फिरवत होती, जस काय तिची अन या शिकाऱ्याची खुप जुनी ओळख असावी, मला तीच कौतुक वाटायल अन भीतीही! शिकारि खुप होते अन तेही एकाच जातीचे,एकाच रहवासातले, अन ती एकटी, तुटून पडले तर काय होईल, माझी धडधड वाढत होती.
तिच्या जवळ बसलेल्या तरुणांची उगाच चुळबूळ वाढली होती, तिच्या अंगाला निमीत्त करून ती जाणवत होती, त्या घोळक्यातला माणूस नावाचा प्राणी केव्हाच संपला होता, वासनेचा राक्षस जागा होत होता, अश्लील बोलणं,अन हसणं वाढत होत, मला तिचा आता राग येत होता, ती गरीब जरी असली तरी, ती एक स्त्री होती, माजावर आलेली मादी नव्हे!मनातून मी प्रार्थना करत होतो, की हिने आता इथून जावं, कारण गाडी फक्त जळगावलाच थांबणार होती. ती नाहीच उठली.
अभिजित दरवाज्यात पायऱ्यांवर बसला होता , त्याला उठवलं तर त्याची जागा जाईल, केव्हाचा ताटकळत उभा होता ,आता कुठ बसला होता तो !,त्याला उठवणं मला बर वाटल नाही. मग मीच  बोलता झालो,
ये गलत है।
अकेली लडकी देखके उसका मजाक करना अच्छी बात नहीं है।
उसके जगह अपनी बेहन होती तो क्या हम ऐसें करते?


माझा हा त्रागा खास तर यासाठी होता की ,माझ्यासोबत कोण कोण आहे, का सगळे त्या शिकाऱ्यासोबत आहे म्हणून, जर काही झालं तर कोणी मदतीला येईल का ?
माझ्या या बोलण्याने २-३ जण सकारात्मक  वाटत होते, मला याचा खुप आनंद झाला.
डब्ब्यामध्ये बसताना भांडणारी अन ही शांत तरुणी विरोधाभासी वाटली, आता मात्र त्या  तरुणाबद्दल वाटणारी करुणाही आटली. कदाचित तिची अगतिकता अन हे असले स्पर्श तिच्या नात्यातले असावे, की ज्यांचा सहवास रोजचा असावा, अन झालाही स्पर्श तर तो आपल्याच व्यक्तीचा आहे,एवढी समजदारी तिच्यात असावी.
एकदाची ती उठली अन त्या डब्यातून परत निघाली, तरीही जाताना एका शिकाऱ्याने तिचा कमरेला पकडलंच...पण ती अलगद या चक्रव्यूहाततुन अगदी वेळेवर बाहेर पडली,अन माझा मनाची घालमेल एकदाची संपली.

गरिबी, पैसा याचा अन वासनेचा काही एक संबंध नसतो, मला कोडं सुटल्यागत झालं.
अगतिकता ,लाचारी,मनु्ष्याला कमजोर बनवते, तिला जर योग्य वेळी ओळखता आलं ना..तुम्ही कोणत्याही चक्रव्यूहातुन अगदी सहज बाहेर पडू शकता...
मगवा पासून दाटलेला श्वास  जळगाव आलं नि मोकळा झाला, मुळात परीक्षेची उत्सुकता नव्हतीच खरी! एका नवख्या प्रदेशाला अनुभवायचं होतं. त्याहीपेक्षा जळगावच गरमागरम वांग्याचं भरीत ओढ लावत होतं......

No comments:

Post a Comment