Tuesday, 26 December 2017

काठीचा आधार



       
वेळेचा अंदाज घेऊन मी अन आकाश एकदाच दवाखान्यात पोहचलो. अगदी ७-८ लोक मावतील एवढा तो मोठा  दवाखाना.पण तिथे असलेली नेहमीची गर्दी राहुरीतल्या मोठया हॉस्पिटललाही लाजवेल एवढी नक्कीच होती.आम्हाला पटकन आवरून दशक्रिया चित्रपट पाहायला जायचं होतं.आमचा नंबर ४-५ पेशंट नंतर येणार होता.त्यामुळे मी तर निवांत होतो, बाकी आकाश मोबाईल मध्ये मग्न होता.
नेहमी प्रमाणे माझी नजर दवाखान्यात इकडे तिकडे फिरू लागली. भिंतीवर लटकावलेले देवाचे फोटो पाहून मी एका क्षणासाठी विचार करू लागलो ...नक्की मी दवाखान्यातच आलो ना!
हो नक्की दवाखान्यातच आलो होतो मी,एका केबिन मध्ये एक वयस्कर, थोडा ढेरी सुटलेला अनुभवी व्यक्ती इंजेकशन भरत होता.टेबलावर औषध्याच्या बाटल्या अन इंजेक्शन पडलेली होती.
मी दरवाज्याजवळ एका बाकड्यावर बसलो होतो, माझी नजर सहज पुढे गेली, एक जोडपं बसलेलं होत.......
वय जेमतेम असेल ७५-७८ च्या आसपास,एक म्हातारी बाकड्यावर झोपलेली होती,पूर्ण शरीराचा मुटकूळा करावा तशी ती झोपलेली होती .अंगावर एकदम मळकट साडी, एखाद्या लाकडाला साडी नेसवावी अशीच होती.
पायाला जखमा झालेल्या होत्या,माश्या त्यावर घोंगावत होत्या,१-२ वेळेस तिने त्यांना रोखण्याचाही प्रयत्न केला पण तिचा हात तिला उचलत नव्हता, कदाचित तिनेे जेवण केलं नसावं.
तिच्या डोळ्यात अश्रू नाही दिसले (कदाचित संपले असतील )परंतु करूण भाव मात्र नक्की होते.डोळ्याची बुबळे पांढरेफटक पडले होते.मध्येच ती उठायचा प्रयत्न करत होती परंतु,नव्हतं जमत तिला....
बाजूलाच  म्हाताऱ्याचा थरथरना हात म्हातारीला सावरत होता, म्हातारीला 'अजुन' ही आधार देत होता.म्हातारा ही तसाच काठीला लटकलेला होता. त्याची अंगाची काळी चामडी पार हाडाला चिकटलेली होती ,सुरकतलेल्या कातड्यावरून 'नसा' स्पष्टपणे दिसत होत्या. तर डोळे निर्विकारपणे नंबर येणाचा वाट पाहत होते,त्याच्या हातातली काठी काहीतरी सांगत होती,का कुणास ठाऊक ? तो तिला जमिनीवर राहून राहून आपटायचा,जणू काही अजून ही त्याने परिस्थितीशी हार मानलेली नसावी असंच काहीतरी! म्हाताऱ्याच्या आवाजात मला धीटपना दिसला कारण त्याचा आवाज नक्कीच त्याच्या वयाला शोभत नव्हता, किती तरुण आवाज होता तो! त्याच मर्दानीने तो म्हातारीला खेकसत होता, अन आधार ही देत होता.
माझी नजर आता आजूबाजूला शोधक नजरेने फिरत होती , कोणीतरी असेल यांच्यासोबत...
पण मी हताश झालो,नव्हतंच कोणी सोबत..
तेवढ्यात त्यांचा नंबर आला...म्हाताऱ्याने तिला उठवलं, थरथरनारे दोन्ही जीव कसेबसे डॉक्टरच्या केबिन मध्ये गेले.
माझा श्वास आता गरम झाला होता,कानशील तापत होती, डोक्यामध्ये मध्ये रक्त वेगाने पळत होत,आयुष्यभर ज्यासाठी धावलो ,पडलो ,झडलो ते अजूनही नव्हतं मिळालं, डॉक्टरच्या इंजेक्शनने ते काय मिळेल!नाहीतरी या शरीराचं झालेलं गाठोडं उगाच बाकड्यावर नसतं झोपलं.
मला उगाच अस वाटत होतं.त्या जोडप्याच्या मळकट चेहऱ्याकडे पाहून मला माझा ही चेहरा आता मळकट वाटू लागला, माझ्या समोर माझं मन 'न'मानणारं सत्य 'आ वासून' उभा होत.जीवनाच्या व्याख्यातील सुरवातीच्या ओळीचा अन शेवटच्या ओळीचा हा विरोधाभास माझ्या हृदयाची धडधड वाढवायला पुरेसा होता.
 'सुख' अगदी 'आकाश'च्या भाषेत सांगायचं झालं तर 'आनंद'हीच तीच गोष्ट! तिच्या साठीच असतो न हा खटाटोप,पण ती नेहमीच चकवा देते आपल्याला, मृगजळा सारखा! आज जीवनाचे शेवटचे क्षण मोजतानाही तो 'आनंद' ते 'सुख' भेटलेलं नव्हतं. मला लगेच म्हाताऱ्या च्या तरूण पणाच चित्र दिसत होतं ,किती उत्साह असेल न ऐन उमेदीत जगण्याचा, त्या मृगजळाच्या पाठीमागे धावण्याचा.
आपण ही तेच करतो नुसतं पळत राहतो, कधीच थांबत नाही, अगदी थकल्यावरही नाही थांबत कारन न संपणाऱ्या 'अपेक्षा ' नाही न थांबू देत.
माझं मन अजून एका गोष्टीने दुखावलं गेलं,आपली आपली म्हणणारी माणसं कधी परकी होतात,हाताखांद्यावर खेळवलेली मुले कधी मोठे होतात ते कळत पण नाही,
ज्यांच्यासाठी सगळं आयुष्य पणाला लावलं, अगदी स्वतःच्या सुखासोबत सुद्धा सौदे केले, नेहमी त्यांच्या साठी 'हार'  मानून स्वतःच दुःख कडवटपणे गिळलं ,त्यांना म्हातारपणी काठीचा आधार व्हायला पण लाज वाटते, किती शोकांतिका ना! मला म्हाताऱ्याच्या हातातल्या 'निर्जीव' काठीचे खूप आभार मानवासे वाटले, जिला सुख, दुःख,भावना, यातना यातलं काहीच समजत नाही ,तिने अजूनही साथ सोडली नव्हती. अन ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवाव्या, ती रक्तामांसाची  'आपली' माणसं निघालीत प्रवासाला,सांगायला वाईट वाटतं,तो प्रवास ही इथेच एका बाकड्यावर थरथरत संपणार आहे, कदाचित  प्रवासात निघालेल्या माणसांना  हे माहीत नसावं ! म्हणजे आपण सर्व प्रवासाला निघालोय पण आपल्याला माहितच नाही कुठे जायचं ते?
तेवढयात म्हाताऱ्याने आजीला पकडून दरवाजातून बाहेर आणलं, म्हातारीमध्ये कसलच त्राण नव्हतं,तिला फक्त थरथरनाऱ्या हाताचा आधार होता, म्हातारा तिला सावरू शकला नाही अन पुढच्याच क्षणाला म्हातारी धपकन खाली पडली, म्हातारा बावरला ,तरीही त्याने तिचा 'हात' सोडला नाही,तो तिला उठवू शकत नव्हता, माझं मन विषण्ण झालं, नकळत माझे हात पुढे सरसावले,आजीच्या दंडाला (नव्हे हाडाला) पकडून उभा केलं, तिचा तो स्पर्श मला माझ्या भविष्याचा अनुभव देऊन गेला. मी तिला खाली बसवलं. मी माझ्या जागेवर येऊन बसलो ,आता माझाही हात थरथरत होता..... माझ्यासाठी हा अनुभव खूप भयंकर होता.मी या प्रवासात 'अचानक' दिशाहीन झालो होतो.
आकाशचा नंबर आला तो चेकिंग साठी आत गेला व आलाही, मी मात्र तसाच स्तब्ध होतो......
तेवढ्यात गणेशचा व भोसले सरांचा कॉल आला.... कुठे आहात पटकन या मूवी सुरू होईल.. घडयाळीत बरोबर 3 वाजले होते.....
आम्ही दवाखान्यातून बाहेर पडलो, शीतल टॉकीजकडच्या रोडला लागलो, मनात आलं हाही एक प्रवास आहे ,पण आता मी खुप 'स्पष्ट' झालो होतो, 
आम्हाला दशक्रिया पाहायला जायचं होतं......
......माझ्या मनाची 'दशक्रिया' मात्र केव्हाच झाली होती.....
                  -गाढवे बाळासाहेब (ढाकेफळ,जालना)


1 comment: