Saturday 29 September 2018

क्षणभंगुर.....

                      क्षणभंगुर.....

थंडगार ऊसाचा रस घेऊन मी अन स्वामीन वेरूळ सोडलं अन पुढच्या वाटेला लागलो. वाकडी वाट करून आम्ही ४ च्या दरम्यान वेरूळला आलो असतोल. कैलाश मंदिराची ती भव्यता अन ते सुंदरे लेणी शिल्प  अवाक करायला लावत होत.परंतु मुघलांच्या आक्रमणामुळे भंग पावलेल्या त्या लेण्या, तिथली हत्तीशिल्पे अजून ही त्या समृद्ध वारशाची साक्ष देत आहेत असं नक्कीच वाटतं.
गेटजवळच्या वडाच्या झाडावर काही माकडे माकडचाळे करत होते अन त्यांचे माकड चाळे पाहनारा  माणूस नावाचा प्राणी (जो की याच प्रजातीचा उच्चकुलीन वंशज होता) त्या बिचाऱ्या माकडांची मजा घेत होता. पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू मात्र होत.
आम्ही आता वैजापूरच्या रस्त्याला लागलो. अजून मावळतीचा सूर्य  हातभर वर होता,त्याचा तो शांत प्रकाश रस्त्यावर सांडला होता. मगवाच्या उसाच्या रसाने पोटात थंडगार झालं होतं,अजून तासाभरात आपण महेशच्या घरी असू, दुपारपासून कावकाव करणार पोट घरच्या जेवणाने कस तृप्त होईल, स्वामीच्या खांद्यावर डोकं ठेवून विचार करत होतो.
आम्ही वेरूळ सोडून  वीसएक मिनिटे झाली असतील, एका वळणावर स्वामीने अचानक ब्रेक लावलं अन गाडी थांबवली,समोर २०-३० माणसे रस्त्यावर उभा होते, दोनचाकी गाड्या थांबत होत्या पण मोठाले वाहन जात होती. समोरची गर्दी पाहून मनात शंकेची पाल केव्हाच चुकचुकली होती. पण कुठेच अपघातासारखं काही दिसत नव्हतं. मी गाडीवरून उतरलो.अन समोरच दृश्य पाहून काळजात धस्स झालं.
एक २४-२५ वर्षाचा तरुण रस्त्याच्या कडेला शांत पडला होता. अंगात मळके कपडे.गळ्यात लाल उपरणं,परंतु तोंड कोणीतरी पांढऱ्या कापडानं झाकलेलं. त्याच्या कपड्यावरून तर तो नक्कीच शहरातला वाटत नव्हता.तो झोपलेला होता. विचारपूस केली तेव्हा लक्षात आलं १० मिनिटापूर्वी अपघात घडला होता. अधारकार्डवरून कळालं की तो जवळच्याच गावातला आहे अन त्याच्या घरचे येत आहेत. मी थोडा जवळ गेलो, रक्त अजून ताज होत, हातापायाची हालचाल होत नव्हती पोट थोडं उघडं पडलेलं होतं, पण पोट खालीवर होत नव्हतं, २-३ मिनिटे मी एकटक त्याच्या पोटाकडे बघत होतो एक आशा होती की आता तरी हालचाल होईल. मध्येच एकजण येऊन म्हणाला,जागेवर गेला राव! बापरे काळजात धसकन झालं, म्हणजे आता तो कधीच उठणार नाही, तो कोणाला बघूही शकणार नाही, त्याच सगळं अस्तित्व मिटणार,त्याचे दोस्त, मुलंबाळं,आईवडील कोणालाच तो आता बोलणार नाही,बघणार नाही. मला ही वस्तुस्थिती सहन होत नव्हती, मी सारखं त्याच्याकडे पाहत होतो,त्याच्या हालचालीची अपेक्षा करत होतो.पण नाही, तो निष्प्राण झाला होता,आतापर्येंत कोणालाही न दिसलेला 'जीव'नावाचा अवयव त्याच्या देहातून निघून गेला होता. पहिल्या वेळेस डोळ्यासमोर मृत्यू पहिला होता, मन सुन्न झालं.
५ मिनिटांनी एक दोनचाकी थांबली. २०-२१ वर्षाची स्त्री उतरली अन त्या व्यक्तीला शोधू लागली,कडेवर १०-१२ महिन्याचं बाळ. पांढऱ्या रुमालाने झाकलेल्या त्या देहाकडे तीन पाहिलं अन ती २ मिनिटं स्तब्ध राहून टकमकपणे त्याकडे पाहत होती,२० मिनिटापूर्वी पलीकडच्या शेतातून येतो म्हटलेला नवरा गपगार पडलेला पाहत ती होती,अजूनही टकमक पणे ती त्याकडे पाहत होती. ती त्याच्या जवळ गेली फिकट लाल चौकड्या शर्टावरून तिने ओळख होतं की तो तिचा मालक होता. तिने फोडलेल्या टाहोने तिथल्या प्रत्येकाचं काळीज चिरत होतं. तिला लोक ओढत होते पण ती त्याला सोडत नव्हती.कडेवरच पोरगं बिथरून ते पण रडायला लागलं अन सगळ्यांचे अश्रू अनावर झाले.
"हिला कोणी आणले  रे , हिला मागे घ्या,आता अँबुलन्स येईल त्याला दवाखान्यात न्यायचं ," एक समजदार व्यक्ती तिला बाजूला करत म्हणत होता.
ती रडत होती फक्त!!
अगं, रडू नकोस तो बेशुद्ध झालाय फक्त आता अँबुलन्स येईल.
"हिला न्यारे  कोणीतरी परत ,कशाला आणलं इकडं"
तिच्या भावाला सांगितल्यावर तो तिला घेऊन जात होता,पण ती आपल्या मालकाकडे पाहत होती पण तो तिच्याकडे पाहत नव्हता ती रडत होती, पब त्याला आवाज येत नव्हता, तो आज अस काय करतोय म्हणून तिला जास्तच रडू येत होतं.
तिच्या कपाळावरची टिकली ही गळून पडली होती, तिच्या त्या अभागी कपाळाकडे पाहून नकळत माझ्या डोळयातून अश्रू आले.
ती नुसती रडत होती, तो फक्त बेशुद्ध झालाय एवढ्याच आशेवर ती होती... पण मुळात तो नव्हता आता. तो संपला होता. आजपासून ती त्याला पोरकी झाली होती, पती नावाचं कुंकू पुसलं गेलं होतं, पांढऱ्या कपाळाने ती जगणार होती....आयुष्यभरासाठी... कडेवरच्या बाळासाठी बाप काय असतो हे समजण्यागोदर तो सोडून गेला होता.. पोटातल्या बाळाचं तर तेवढं ही भाग्य नव्हतं ...क्षणात सगळं संपल होतं... त्याचा सहवास... त्याच बोलणं,  मुळात त्याच असणं.... आता नव्हतं ....आज एक चाक अलगद निखडून गेलं होतं... सगळा भार त्या अभागी कपाळावर सोडून.... कल्पना ही करवत नाही तिचा उद्याचा दिवस काय असेल... त्या मुलांचं काय?  त्या मायबापाच काय? कितीतरी प्रश्न क्षणात डोंगराएवढे झाले होते..
ती स्वतःला सावरू शकत नव्हती, त्या बाळाकडे तीच लक्ष नव्हतं,तिला लोकांनी गाडीवर बसवलं पण ती अंग सोडून देत होती ....तीला त्याला सोडून जाऊ वाटत नव्हतं....तो म्हटला होता मी २० मिनिटात परत येतो म्हणून.......!
कसंबसं तिला बसवलं न जायला सांगितलं....
आम्ही ही तिच्या मागे आमची गाडी घेऊन जात होतो..... भीती वाटत होती ती स्वतःला सावरू शकेल का ? शिवाय छोटं बाळ सोबत..... किमान ६ किलोमीटर आम्ही तिच्या मागे जात होतो .......मगवापासून रडणार बाळ तिच्या कुशीत शांत झाल होत....ते झोपलं असावं .....नाहीतर आपल्या अभागी आईच्या नवऱ्याला जाब विचारत असावं......
एका वळणावर ती वळाली..... अन दुसऱ्या वळणावर तो निष्प्राण झाला होता ....
मनाला पोळवून गेलेला प्रवास आयुष्यभरासाठी हुरहूर सोडून गेला........क्षणभंगुर जीवनाचा!!!😢😢