Monday, 16 April 2018

न उमलणाऱ्या कळ्या....

काल ती गेली होती.... आज ही गेली.... अन उद्या दुसरी कोणीतरी जाईल.... काय  अन कितीसा फरक पडतो कोणाला?
व्हाट्सएप स्टेटस, ब्लॉग,डीपी, कँडल मार्च किंवा निषेधाचे मोर्चे घेऊन आपण गल्लोगल्ली फिरू, आम्ही खरंच खूप संवेदनशील आहोंत याचा आव पण आणू! उद्या अजून कोणीतरी कोणाची वासना बनेल ,शिकार बनेल ...मग आम्ही परत मोर्चे काढू, व्हाट्सएप स्टेटस ठेवू, नाही का? आपण किती जागरूक आहोत किंवा आम्ही किती मानवतावादी आहोत हे जगाला ओरडून सांगू... पण???
पण असे केल्याने हे कमी होईल का? एव्हाना आतापर्येंत झालंय का?? मग का करतो आपण ...ज्यातून काहीच भेटत नाही.. काहीच कमी होत नाही...
कोपर्डी झालं.....लाखोंच्या गर्दीने मोर्चे निघाले.... मग काय झालंय .....पुन्हा कोपर्डी झालंच नाही का.... पुन्हा एखादा जीव बळी पडलाच नाही का?? आपण आंधळे बनत चाललो आहोत...
कालच पिंपरी चिंचवडची घटना, स्वतःच्या बापाने मुलीवर बलात्कार केला... आता काय करणार आहोत आपण..... कुठे ठेवणार आहोत आपण  या निरागस पाखरांना, स्वतःच्या घरट्यातच जर वासनेने बटबटलेला साप गिळायला तयार असेल तर बाहेर तर  हजारो साप सावजासाठी डूख धरून बसलेले आहेत......
उद्या यांना फाशीची शिक्षा देऊन हा प्रश्न खरंच मिटणारा आहे का? प्रश्न इथे मानसिकतेचा आहे ....इथला समाज सडत चाललाय ...आधुनिकतेच्या नावावर संस्कृती वरच हजारो वर्षापासून बलात्कार होत आहे अन त्यामूळे इथला माणूस नावाचा प्राणी सुद्धा  वासनाधीन झालाय..संस्कृती कधीच विज्ञानाच्या आड आली नाही परंतु आपल्या आधुनिकतेच्या भुताने संस्कृतीचे लक्तरे मात्र वेशीवर टांगली आहेत. अन याला परंपरावाद्यांनी विरोध केला तर व्यक्तिस्वातंत्र्याच्या अस्त्राने त्यावर नेहमीच हल्ला केलाय ...अन आशा कोंदट वातावरणात जर नवा समाज जन्म घेत असेल तर यापेक्षा दुसरी अपेक्षा काय ती करावी....
नीती मूल्य,तत्वे ही फक्त आता पुस्तकात वाचताना छान वाटतात किंवा स्टेटस मध्ये उठून दिसतात ,पण त्यांची रोज होणारी कुचंबना कोणाच्या लक्षात येत नाही किंवा ती आणायची नाही...
आज एका स्त्रीला एक मादी म्हणूनच पाहिलं जातं ,यात दोष पुरुषाचा की स्त्रीचा की आपण स्वतःच्या मानगुटीवर बसवून घेतलेल्या व्यक्तीस्वातंत्र्याच्या भुताचा. TV सिरिअल्स, किंवा चित्रपटाद्वारे आधुनिकतेच्या नावाखाली  आपल्या संस्कृतीचं जे काही दमन चालवलं आहे न त्याचा तर परिपाक नसावा हा?? पण हा प्रश्न कोणालाच पडत नाही.
माणूस हा अनुकरणशील प्राणी आहे ,जर अनुकरणच सदोष असेल तर निपजणारा समाज कितपत चांगला असेल! याची अपेक्षा न केलेलीच बरी!!
माझा हा मुद्दा बऱ्याच जणांना रुचनारा नसेलही कदाचित ,परंतु  ही वस्तुस्थिती आहे..चांगला समाज अन वाईट समाज बनवलं हे आपल्या हातात असतं..... समाज घडवणारे हातच,..म्हणण्यापेक्षा  तत्वच जर दूषित असतील तर सुसंस्कृत समाज कसा बनेल..! अन जर तो बनत नसेल तर असिफा सारख्या निरागस कळ्याना कोणी वाचवू शकणार नाही....याच दुःख वाटतं..😢