Monday, 12 February 2018

ती....... भाग १



....ती एका हातात बॅग अन एका हाताने चेहऱ्यावरचे केस आवरत बस मध्ये चढली. गडद निळ्या रंगाचा टॉप तिच्या गोऱ्या वर्णावर आज जरा जास्तच खुलून दिसत होता. आज ती फ्रेश दिसत होती.. तिच्या गालावर पडणारी खळी वेड लावणारी होती.  बस मध्ये जास्त गर्दी नसल्याने तनुजाला जागा भेटली.कॉलेज सुरू होऊन १५ दिवस झाले होते, रोजची गर्दी नसल्याने तिला थोडं हायसं वाटलं. तरीही८-९ वीचे मुलं मुली जागेसाठी गोंधळ करत होते.तनुजाला पाठीमागून दोन नंबरची  सीट मिळाली. पाठीवरची बॅग सिटवर ठेवून तिने त्यातून एक चॉकलेट काढलं, इकडे तिकडे बघत गपकन तोंडात टाकलं , अन त्या चॉकलेटच टरपल खिडकीतून बाहेर फेकलं.
 पाच एक मिनिटांनी कंडक्टर ने दिलेल्या घंटीच्या  आदेशाने बसने जागा सोडली अन ती पळती झाली. तेवढ्यात गाडीच्या पाठीमागच्या बाजूला कोणतरी जोरात धाप धाप मारत होत. ड्रायव्हरने कचकन ब्रेक दाबलं, अन सगळे जण समोरच्या सिटवर धडकले. अन गाडी थांबली. कंडक्टरने वैतागून दरवाजा उघडला.हातात २ पुस्तकं घेत तो धापा टाकत बसमध्ये चढला, कंडक्टरने खिडकीतून बाहेर परत कोणी आहे का पाहिले अन दोरी ओढली ,दुसऱ्यांदा घंटी वाजली.अन बस धावू लागली.
तो अजून धापा टाकत होता, घामाने त्याचा चेहरा डबडब झाला होता. खिशातल्या रुमालाने तोंड पुसत तो जागा पाहत होता. तो तिच्या शेजारी बसला.अन एक मोठा श्वास घेऊन बस मिळाल्याच्या आनंदात तो सोडला !तनु २ मिनिटे स्तब्ध होती, कारण तिच्या तोंडात चॉकलेट होत, तिला कळत नव्हतं की ते याच्यापुढे खावा की खाऊ नये? ती त्याला बसमध्ये पहिल्यांदा पाहत होती. खिडकीकडे तोंड करून तीनं ते पटपट खाल्ल.छोट्या रुमालाने तोंड पुसून ती समोरच्या सीटकडे पाहत बसली. अधून मधून ती तिरकस पणे त्याच्याकडे पाहत होती.
तो गावात नवीन होता. आज त्याने जांभळ्या रंगाचं शर्ट अन पांढरी पॅन्ट घातलेली होती, नाकाडोळ्यात तो सुंदर होताच पण त्याचा गोरा वर्ण त्याला अधिक रुबाबदार बनवत होता, त्याच्या केसाचा भांग अन त्याचा हसरा चेहरा त्याला अधिकच सौंदर्य प्रदान करत होता. शाम नानाच्या घरी पाहूणा होता .नानाच्या बहिणीचा तो एकुलता एक मुलगा होता. गावाकडे शिक्षणाची सोय नसल्याने तो मामाकडे आला होता. नाना म्हणजे गावातलं चांगलंच प्रतिष्ठित प्रस्थ आहे.२५ एकर निव्वळ काळ्या मातीची बागायती फक्त गावात त्यांनाच आहे.
शाम आता बराच सावरला होता. चिंचखेड्याहून अंबडला जायला पाऊण तास लागतो. अंबडला शाळा,कॉलेज चांगले असल्याने सगळ्या पालकांचा ओढा शिक्षणासाठी अंबड हाच असे. शामने  बाजूला पाहिलं ,तनुकडे तो पाहतच राहिला, त्याला उशिरा आल्याचा आता आनंद  झाला ,त्यामुळे त्याला तिच्या जवळ जागा मिळाली. तनुजा सुंदर तर होतीच पण ती आज जास्तच सुंदर दिसत होती .तिचे केस अजूनही ओले होते,तिने नेमकीच अंघोळ केलेली असावी म्हणून ती जास्त फ्रेश दिसत होती. शामला ती आवडली होती. पण तनु ने अजूनही त्याला नीट पाहिलं नव्हतं. तिला अजून एक चॉकलेट खाऊ वाटत होतं,पण तिला खाता येत नव्हतं, तिला आज पहिल्यांदा आगंतुकासारखं वाटत होतं. ती सतत मांडीवर ठेवलेल्या बॅगला  सावरत होती.
तनु अन शाम दोघेही यावर्षी १२वी विज्ञान शाखेला होते.शाम यावर्षीच रामदास कॉलेज मध्ये आला होता. अन आज त्याचा कॉलेज चा पहिला दिवस होता. नवीन दिवसाचं टेन्शन त्याच्या चेहऱ्यावर दिसत होतं पण त्याने तनूला पाहिल्यानंतर ते काहीसं कमी झालं.तनु मात्र निवांत होती.तो जवळ बसल्यामुळे तिलाही  थोडसं टेन्शन आलं होत खरंं. ती खिडकीत पाहत होती, बस गावाकडच्या कच्च्या रस्त्याने जात असल्याने गाडी गुलाल उधळल्यागत फुफाटा करत जात होती. खेड्यातील रस्त्यावर खड्डे  पाचवीला पुजलेले असल्याने गाडी आदळत ही होती, तिच्या या पराक्रमाने तनु अन शाम मधलं मगवाच अंतर थोडं का होईना कमी झालं होतं. ते मात्र दोघांनाही समजलेलं नव्हतं.
तेवढ्यात अचानक तनूच्या डोळ्यात काहीतरी गेलं अन ती डोळा चोळू लागली. थोड्याच वेळात तिचा डोळा लाल झाला . डोळ्यातला कचरा मात्र अजून निघाला नव्हता. कचऱ्यामुळे होणारी आग तीला असह्य करत होती,तिचा डोळा ओला झाला होता. शाम शांतपणे तिच्याकडं पाहत होता. तिचा लाल झालेला डोळा त्याला पाहवत नव्हता तरिही तो काही करू शकत नव्हता. कचरा अजून निघाला नव्हता, पहिल्यांदा तिने रडावलेल्या चेहऱ्याने शामकडे पाहिलं. तीच त्या पाहण्याने त्याला कसंतरी झालं,
काय झालं, डोळ्यात कचरा गेलाय का? तो पुटपुटला.
मगवाच्याच रडावलेल्या चेहऱ्याने तिने ,हं! केलं.
ती त्याच्याकडे आशेने पाहत होती.
तो तिच्या कडे सरसावला, दोन्ही हाताने तिच्या डोक्याला पकडून त्याने तिच्या डोळ्यावर फुंकर मारली.२-३ वेळेस फुंकर मारल्यावर कचरा बाहेर आला. डोळ्याची जळजळ एकदम थांबली अन तिला हायसं वाटलं. कचरा निघाल्याने शामला ही बर वाटलं. ती कृतज्ञतनेच्या भावनेनं शाम कडे पाहू लागली, अन स्मितहास्य करून थँक्स म्हणाली.तिच्या गालावर पडणाऱ्या खळीने शाम अधिकच खुश झालं, मनातल्या मनात देवाला लाखो वेळा धन्यवाद देऊ लागला. एवढ्याश्या प्रसंगाने दोघेही आता ओळखीचे झाल्यासारखें दिसत होते. तिच्याही चेऱ्यावरच स्मितहास्य लपत नव्हतं, तीही मनोमन खुश झाली होती. थोडा वेळ असाच गेला, दोघहि पुन्हा तटस्थ झाले,एकमेकांपासून नजर लपवत  चुळबुळ करत होते. त्याच्या मनात प्रेमाच्या लाटेने केव्हाच किनारा गाठला होता तर तीच्या मनात परोपकाराची भावना अंकुरली होती. गाडी चांगल्या रस्त्याने लागल्याने शांतपणे धावत होती. बसमधला किलबिलाटही बराचसा शांत झाला होता. शाम तर जाम खुश दिसत होता, कॉलेजचा पहिलाच दिवस अन तिच्या सोबत झालेली पहिली भेट त्याला सारखी हर्षोउल्हासित करत होती. कोऱ्या वहिचे कोरे पान तो पुन्हा पुन्हा वाचत होता.
तेव्हड्यात ड्रायव्हरने मगवासारखं करकचून ब्रेक दाबलं, अन बस मध्ये एकच गोंधळ उडाला.  शामचं डोकं समोरच्या सिटच्या पाठीमागच्या दांडीवर जोरात आदळलं, अन तो वेदनेने विव्हळला. तो डोक्यावर हात चोळत होता अन ते पाहून तनु हसत होती. सुरुवातीला त्याला तिचा राग आला पण तिच्या गालावर पडणाऱ्या खळीने मात्र त्याचा राग हवेतच विरघळला, आता तोही हसत होता. दोघे एकमेकांकडे पाहून हसत होते अन त्यांची ओळखही नकळत वाढत होती.
एकदाचं अंबड बसस्टँड आलं, गोंगाटासह बस मधली गर्दी रीती झाली अन बस ने मोकळा श्वास सोडला, शाम तनूच्या नंतर उतरला. तो आशेने तिच्याकडे पाहत होता पण तिने एकदाही मागे न पाहता ती कॉलेजच्या रस्त्याने चालू लागली.
तनु माधवकाकाची दुसरी मुलगी पण आता एकुलती एक, कारण २ वर्षांपूर्वी तिच्या मोठ्या बहिणीच कसल्याशा आजाराने निधन झालं होतं.यंदा माधव काका थोड्याश्या मताने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हरले होते.४ एकरावरच्या मोसंबीच्या  बागेने बक्कळ पैसा जमवला होता. माधवकाका ला मुलगा नव्हता, त्यामुळे तनूचे लाड घरात सर्वच जण करायचे. पण तनु लाडाने बिघडणारी मुलगी नव्हती, ती संस्कारी होती. तिचा शांत स्वभाव सर्वांना आवडत असे. गेल्याच वर्षी तिला सोयगावचे पाहुणे पाहून गेले. मुलाला ती पसंत होती, पण तिला आताच लग्न करायचं नव्हतं, अण्णाला तिने सांगून ठेवलं होतं की मला अजून शिकायचं,किमान बारावी तरी पूर्ण करायची. अण्णाही तिच्या शब्दाबाहेर गेले नाहीत,१० वीला शेकडा ८० गुण मिळाल्याने अण्णानेच तीच ऍडमिशन अंबड ला केलं होतं. शिवाय ती गावातली दुसरीच मुलगी होती जी विज्ञान शाखेत अंबडला शिकत होती.यावर्षी १२ वीला असल्याने ती अंबडला रूम करून राहणार होती. पण रूम पार्टनर भेटत नसल्याने सध्या बसनेच जात होती.
१० वाजता जाधव सरचे जीवशास्त्रच लेक्चेर होतं. तनु दुसऱ्या नंबरच्या बाकावर बसत असे.जाधव सर आज मेंडेलचे नियम शिकवणार होते, लेक्चर सुरू होऊन १० मिनिटे झाली होती.
.....may I come in sir  त्याने विनंती केली.
सगळे जण दरवाजाकडे पाहत होते.
Yes, सर ने त्याला आत घेतलं.
why you are late?
Are you new student?
If new, then introduce yourself to all of us.
सगळे प्रश्न सरने एकदाच विचारले.
Yes sir.
I am new student of this college,late admitted.
My name is Sham Ramakant kadam
I am from chinchkheda. तो उत्तर देऊन शांत झाला.
Okk , then take your seat ,and give attention towards lecture.सरने आवरत घेत त्याला बसायला सांगितलं.
Now,Lets see the rules of mendel............सरने लेक्चरला सुरुवात केली.
सगळे जण त्याचं introduction ऐकून अवाक झाले होते, कारण पहिल्यांदा कोणीतरी इंग्लिशमध्ये परिचय करून दिला होता. तनु तर अजून शॉक होती ,ती सारख त्याच्याकडे पाहत होती.तिला खूप आनंद होत होता.कारण सकाळी तिच्यासोबत घडलेला तो प्रसंग तिच्या पारपटलावर फिरू लागला, का कुणास ठाऊक तिला स्वतःचाच अभिमान वाटत होता. शाम हुशार होता.त्याला इंग्लिश छान जमत होतं.
लेक्चर संपत आल होतं, सरने हजेरी घ्यायला सुरुवात केली, एकामागून एक नंबर घेत मुले हजेरी देत होते.
तनुजा शिंदे?
Yes sir, ती उठली.
आता शॉक होण्याची वेळ शामची होती. आज त्याला धक्यामागून धक्के भेटत होते. जी त्याला पाहताक्षणी आवडली होती ती मुलगी त्याच्याच वर्गात होती. तो खूप सुखावला. तास संपल्यावर सर्व मुलं बाहेर जात होती, शाम मुद्दामहुन पाठीमागे राहिला होता.ति तिच्या मैत्रिणी सोबत दरवाजातून बाहेर जात होती. मोठ्या आशेने तो तिच्याकडे पाहत होता,पण ती त्याच्याकडे न पाहताच निघून गेली.तो हिरमुसला. हातात वही घेऊन तो पण वर्गाबाहेर पडला.
(क्रमशः)
#balraje28